गोकुळ निवडणूक : सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल


गोकुळ निवडणूक : सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल
.हासूर येथील कै. राऊ सखाराम पाटील सहकारी दूध संस्थेची कारवाई

कोल्हापूर : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……………………………….
सर्वोच्च न्यायालयाने दि. ६ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांच्या आत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला नसल्याने करवीर तालुक्यातील हासूर येथील कै. राऊ सखाराम पाटील सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल महादेव कवडे, प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, तत्कालीन उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे विभाग पुणे राजकुमार पाटील, सध्याचे उपनिबंधक देविदास मिसाळ तसेच सहनिबंधक दुग्ध कोल्हापूर कृष्णात ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.
. या अधिकाऱ्यांनी संगनमताने गोकुळ दूध संघाची निवडणूक जाणीवपूर्वक लांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
. श्री स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्था, पुंगाव यांनी दि. २९ जुलै २०२६ रोजी सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ घेण्याचे आदेश दिले होते. तसेच आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
. त्यानुसार प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न केल्याबद्दल उपनिबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे नाराजी व्यक्त करून तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर श्री. मिसाळ यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध कोल्हापूर येथील कृष्णात ठाकरे यांना ठराव मागणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न केल्याबाबत खुलासा देण्याचे आदेश दिले होते.
मात्र, आजअखेर कृष्णात ठाकरे यांनी प्रारूप मतदार यादी संदर्भात कोणतीही माहिती सादर केली नसल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा दावा करत हासूर येथील कै. राऊ सखाराम पाटील सहकारी दूध संस्थेने ही अवमान याचिका दाखल केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार विहित कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असतानाही निवडणूक कार्यक्रमाला अद्याप सुरुवात न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
. या अवमान याचिकेची सुनावणी सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून शासनाने मुदतवाढीसाठी दाखल केलेल्या अर्जावरही त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
…………


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!