कागलला मिळालेली पदे हा केवळ ‘योगायोग’; संभ्रम दूर करण्यासाठी हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
कागल : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)
कागल तालुक्याला एकाच वेळी विविध संस्थांची महत्त्वाची पदे मिळाली, हा केवळ एक योगायोग होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाभर वाढवण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी विविध संस्थांमधील पदांच्या निवडीबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
के. डी. सी. सी. बँक आणि गोकुळमधील निवडी
मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDCC) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. तत्कालीन आमदार के. पी. एन. पाटील यांनी अध्यक्ष व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सर्व नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांना हे पद स्वीकारावे लागले.
गोकुळ दूध संघाच्या बाबतीतही बोलताना त्यांनी सांगितले की, अध्यक्षपदाबाबत आधीच काही शब्द दिले गेले होते. मात्र, ऐनवेळी बदललेल्या राजकीय परिस्थितीत आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार युतीचा अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला. या प्रक्रियेत राजकीय तडजोडीतून निर्णय घ्यावे लागल्याचे त्यांनी नमूद केले.
बाजार समितीच्या निवडीबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, तिथे रोटेशन पद्धतीनुसार पदे देण्यात आली. कागल तालुक्याचा क्रमांक आल्यानंतर सूर्यकांत पाटील अध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेच्या बाबतीतही कार्यकर्त्यांच्या भावना आणि इतर नेत्यांशी झालेली चर्चा विचारात घेऊनच निर्णय घेण्यात आले.
‘युती’ भक्कम करण्यावर भर
हसन मुश्रीफ यांनी पत्राच्या शेवटी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की:
”या सगळ्या घटना केवळ योगायोगाने घडल्या आहेत. मी ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये होतो, तेव्हा ती भक्कम करण्याचा प्रयत्न केला. आता मी ‘महायुती’मध्ये कार्यरत असून, मंत्री म्हणून माझी जबाबदारी युती भक्कम करण्याची आहे. युतीचे सगळे पदाधिकारी एकदिलाने कसे काम करतील, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”
आपल्या विधानाचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये, ही वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात ना. हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
……….












