कार कालव्यात कोसळताना दगडाला तटल्याने मोठा अनर्थ टळला : दिंडनेर्लीजवळ घटना
कागल : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)
दिंडनेर्लीजवळ गुरुवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात नशिबाने बलवत्तर म्हणून कारमधील सहा प्रवासी थोडक्यात बचावले. भरधाव कार उलटून कालव्यात कोसळणार इतक्यात ती काठावरील एका दगडाला जाऊन तटली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कारमधील दोन लहान मुलांसह सहाही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अब्दुललाट येथील दोन कुटुंबातील चार प्रौढ आणि दोन मुले गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास कारने नंदगाव-दिंडनेर्लीमार्गे कोल्हापूरकडे जात होते. दिंडनेर्ली येथील दूधगंगा डाव्या कालव्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे काढलेल्या पर्यायी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या अंधारात रस्ता संपल्याचे न समजल्याने चालकाने जोरात ब्रेक मारला. यामुळे कार कालव्याच्या दिशेने उलटली, मात्र सुदैवाने ती काठावरील दगडांना धडकून तिथेच थांबली.
अपघाताचा आवाज ऐकून जवळच भजनाचा कार्यक्रम सुरू असलेल्या घरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारमधील सर्वांना सुखरूप बाहेर काढले आणि एका टेम्पोच्या साहाय्याने उलटलेली गाडी सरळ केली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रशासनाने या ठिकाणी कोणतेही सूचनाफलक लावले नसल्याने आणि पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तातडीने सूचनाफलक लावावेत आणि रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
……….












