काळम्मा बेलेवाडी येथे विजेचा धक्का लागून चिमगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; कागल तालुक्यात हळहळ


काळम्मा बेलेवाडी येथे विजेचा धक्का लागून चिमगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; कागल तालुक्यात हळहळ

​बिद्री : प्रतिनिधी

व्हिजन मराणी न्यूज

कागल तालुक्यातील काळम्मा बेळेवाडी येथे आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. डंपरमध्ये विजेचा करंट उतरल्याने डंपर चालक योगेश उर्फ राजेंद्र बाळू बारड (वय २७, रा. चिमगाव, ता. कागल) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बारड हा चिमगाव येथील असून तो एका खासगी डंपरवर चालक म्हणून काम करत होता. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो डंपर घेऊन काळम्मा बेळेवाडी येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गेटजवळील एका पंक्चरच्या दुकानासमोर आला होता. डंपरच्या मागील टायरचे पंक्चर काढण्यासाठी त्याने गाडी उभी केली होती.

​डंपर उभा करून योगेश खाली उतरला असता, त्याला मागील चाकातून धूर येत असल्याचे दिसले. गाडी थोडी पुढे घेत असताना डंपरच्या वरील भागाचा स्पर्श वरून गेलेल्या उच्च दाबाच्या (हाय व्होल्टेज) विद्युत तारांना झाला. क्षणात डंपरमध्ये करंट उतरला आणि योगेशचा हात डिझेल टाकीला लागताच तो तिथेच चिकटला गेला.

नागरिकांचे बचावकार्य आणि दुर्दैवी अंत

टायर जळू लागल्याचे आणि चालक टाकीला चिकटल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी मोठी आरडाओरड केली. काहींनी तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी कळवले, तर उपस्थित नागरिकांनी लाकडी काठीच्या सहाय्याने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

​योगेशला गंभीर अवस्थेत तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज आणि त्यानंतर कोल्हापूरच्या सीपीआर (CPR) रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, विजेचा झटका इतका तीव्र होता की त्याचे शरीर मोठ्या प्रमाणात भाजले होते. दुर्दैवाने, सीपीआर रुग्णालयाच्या दारात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

कुटुंबाचा आधार हरपला

मृत योगेश बारड याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्याचे आई-वडील शेतकरी असून घरात तोच कर्ता पुरुष होता. अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभाव असलेल्या योगेशच्या निधनाने बारड कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेची नोंद कोल्हापूर येथील सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!