सावर्डे बुद्रुक येथे २६ एप्रिलपासून श्री लक्ष्मी देवी उत्सवाचे आयोजन; जंगी कुस्त्यांचे मैदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
…………………
कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे सन २०२६ चा श्री लक्ष्मी देवी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. रविवार दि. २६ एप्रिल ते मंगळवार दि. २८ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत हा उत्सव संपन्न होणार असून यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी ९ वाजता भव्य पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आणि दुपारी १ वाजता श्री लक्ष्मी देवीची आरती होईल. रात्री ९ वाजता भाविकांसाठी करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आरती झाल्यानंतर, दुपारी १२ ते ४ या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. रात्री ९ वाजता करमणुकीचा भव्य ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे.
मंगळवार दि. २८ एप्रिल हा उत्सवाचा मुख्य दिवस असून सकाळी ९ वाजता आरती होईल. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत महाप्रसाद आणि मोफत सरबत सेवा दिली जाईल. दुपारी २ वाजल्यापासून या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले ‘जंगी कुस्त्यांचे मैदान’ रंगणार आहे. या मैदानात अनेक नामवंत मल्ल सहभागी होणार असून कुस्ती शौकिनांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. रात्री ७:३० वाजता कार्यक्रमाची सांगता होईल.
या उत्सवासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कागल पंचायत समितीचे उपसभापती डॉ. इंद्रजित पांडुरंग पाटील, सरपंच सौ. राजश्री शिवाजी चिंदगे, उपसरपंच सागर आनंदराव सावर्डेकर, पोलीस पाटील राजेश मारुती कुंभार आणि गावकी पाटील हिंदुराव दत्तू पाटील उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवाचे नियोजन श्री लक्ष्मी देवी ट्रस्ट मंडळ, अध्यक्ष दत्तात्रय सदाशिव हिरूगडे, उपाध्यक्ष तानाजी मारुती हिरूगडे (सर), समस्त हिरुगडे परिवार आणि समस्त ग्रामस्थ मंडळ, सावर्डे बुद्रुक यांनी केले आहे. नोकरीनिमित्त गावाबाहेर असलेल्या सर्व बांधवांनी आणि भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
……..












