फोटो-व्हिडिओ दरवाढीसंदर्भात राशिवडे येथे फोटोग्राफी व्यावसाईकांची बैठक


फोटो-व्हिडिओ दरवाढीसंदर्भात राशिवडे येथे फोटोग्राफी व्यावसाईकांची बैठक

बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
………

कोल्हापूर पश्चिम फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने राशिवडे येथे फोटो व व्हिडिओ शूटिंगच्या दरवाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी व्यवसायासमोरील सध्याची परिस्थिती, वाढलेला खर्च आणि महागाईचा परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत उपस्थित सदस्यांनी आपली मते मांडताना सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून फोटो व व्हिडिओ सेवांच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र या कालावधीत कॅमेरे, लेन्स, ड्रोन, संगणक, एडिटिंग सॉफ्टवेअर, इंधन, वीज तसेच इतर आवश्यक साहित्यांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांना व्यवसाय टिकविणे कठीण होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यावर सर्वानुमते चर्चा करून फोटो व व्हिडिओ सेवांच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने निश्चित करण्यात आलेले दर लवकरच लागू करण्यात येणार असून ग्राहकांनी या दरवाढीचा सकारात्मक स्वीकार करून सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र पाटील यांनी केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप पाटील होते. त्यांनी व्यवसायातील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी संचालक संदीप कळंत्रे, राजू तांबोळी, रणजित पाटील, बळवंत रोटे, अशोक पाटील, यांच्यासह फोटोग्राफर संजय नकाते, सदाशिव ढोणे, अमर महाडिक, दत्ता गुरव, अनिल परिट आणि परिसरातील अनेक फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर उपस्थित होते.

बैठकीत संघटनात्मक बळकटी, व्यवसायातील एकजूट आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. नवीन दररचना लागू झाल्यानंतर सर्व सदस्यांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
………


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!