‘अन्नपूर्णा शुगर’ इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसाला दर देईल : संजयबाबा घाटगे


‘अन्नपूर्णा शुगर’ इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसाला दर देईल : संजयबाबा घाटगे

– स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन ; श्री अन्नपूर्णा शुगरची भूमिका स्पष्ट

केनवडे : प्रतिनिधी

वाढलेल्या महागाईमुळे खते, औषधे, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली असून शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. याचा गांभीर्याने विचार करून यंदा ऊसाला चांगला दर मिळावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना वतीने श्री अन्नपूर्णा शुगर कारखान्याला नुकतेच लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत, इतर कारखान्यांच्या ऊस दराबाबत तोडग्यातून जो दर निघेल, त्याच्या बरोबरीने आम्ही दर देण्यास बांधिल आहोत. अशी भूमिका कारखान्याचे संस्थापक संजयबाबा घाटगे यांनी स्पष्ट केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘अन्नपूर्णा’ स्थळावर येवून आपल्या मागणीचे निवेदन दिले. याबाबत आपली भूमिक स्पष्ट करताना संजयबाबा घाटगे म्हणाले, ‘अन्नपूर्णा शुगर’ हा गुळ पावडर उत्पादन करणारा प्रकल्प आहे. हा कारखाना ‘शुगर कंट्रोल ॲक्ट’च्या कक्षेत येत नाही आणि प्रकल्पाला कोणतेही उपपदार्थ बनविण्याची परवानगी नसल्यामुळे इतर साखर कारखान्यांचे नियम या प्रकल्पाला लागू होत नाहीत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना, राज्यातील इतर शेतकरी संघटना, राज्य शासन आणि कारखानदार यांच्या चर्चेनंतर ऊस दराचा जो अंतिम तोडगा निघेल, त्याप्रमाणे ऊस दर देण्यास आम्ही बांधिल आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
……..
चौकट : नुकसान सहन करूनही इतरांच्या बरोबरीत दर !

अन्नपूर्णा प्रकल्पाला व्हॅल्यू ऑडिट (मुल्यवर्धन) करणारे इथेनॉल, स्पिरिट व अन्य उपपदार्थ बनविण्याची परवानगी नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतर दराची कोंडी फुटल्यावर आणि साखर आयुक्तांनी गाळप हंगाम सुरू करण्याच्या निर्धारित केलेल्या तारखेनंतरच आम्ही खांडसरी साखर उत्पादन सुरू करतो. तसेच, गेली सहा वर्षे महाराष्ट्रातील पहिल्या पंधरा कारखान्यांच्या बरोबरीत स्वतः नुकसान सहन करूनही आम्ही ऊसाला नेहमीच चांगला दर दिला आहे आणि ही परंपरा पुढेही अखंडीतपणे राहिल.
असे श्री घाटगे यांनी सांगितले.
………
फोटो ओळी: केनवडे येथील अन्नपूर्णा शुगरचे संस्थापक संजयबाबा घाटगे यांना मागण्यांचे निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.
….


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!