भिवंडीत टीईटी पेपर फुटला !  २८ जूनची शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलली


भिवंडीत टीईटी पेपर फुटला !  २८ जूनची शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलली
– परीक्षार्थिंना मनस्ताप

​पुणे : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
…………………..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न एका ठिकाणी आधीच लीक झाल्याचे समोर आल्यानंतर परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत जाहीर प्रकटन परीक्षा परिषदेच्या आयुक्तांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.  परीक्षेची पुढील तारीख कळविण्यात येईल. असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे.

याबाबत माहिती अशी की शनिवार २७ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका ठिकाणी धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत काही इसमांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेविषयीची माहिती व साहित्य मिळून आले. परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भिवंडी येथे जाऊन या साहित्याची पडताळणी केली असता, संबंधित इसमांकडे सापडलेले प्रश्न आणि उद्या होणाऱ्या मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही परीक्षा राज्यातील एकूण १,०२८ केंद्रांवर होणार होती. ‘नीट’ (NEET २०२६) परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने सुरक्षेचे कडक उपाय केले होते. मात्र, परीक्षेची संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबतची पुढील तारीख आणि अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) प्रसिद्ध केली जाईल, असे परीक्षा परिषदेकडून कळवण्यात आले आहे.
……………..


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!