‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा कागल तालुक्यात दिमाखात प्रारंभ
कागल: लोकसहभागातून आरोग्य क्रांती घडवण्याचा कागल पंचायत समितीचा संकल्प
कागल : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कागल पंचायत समिती येथे तालुकास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण महाराष्ट्र अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या संकल्पातून हे अभियान राबवण्यात येत असून केवळ उपचारच नव्हे, तर ‘प्रतिबंधात्मक उपाययोजना’ हे या मोहिमेचे मुख्य सूत्र आहे. स्वच्छ पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण आणि जीवनशैलीशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळवणे हे या अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
लोकसहभागातून अभियान यशस्वी करा: सभापती
कार्यशाळेचे मार्गदर्शन करताना पंचायत समितीच्या सभापती मा. सुवर्णा पाटील म्हणाल्या की, कागल तालुक्यामध्ये हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी संपूर्ण लोकसहभाग आणि सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे. हे अभियान केवळ आरोग्य विभागाचे नसून, एक ‘टीम’ म्हणून काम केल्यास आपण कागल तालुका आरोग्यदृष्ट्या आदर्श बनवू शकतो. यावेळी उपसभापती इंद्रजीत पाटील यांनीही आपले विचार व्यक्त करत अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच गट विकास अधिकारी माननीय श्री. कुलदीप बोगे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होत असून राज्यस्तरामध्ये कागल तालुका अग्रेसर राहील, अशी ग्वाही दिली.
अभियानाची वैशिष्ट्ये व अंमलबजावणी:
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी अभियानाच्या उद्देशावर प्रकाश टाकताना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर भर दिला. यामध्ये स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनातून आजारांना अटकाव करणे, गरोदर माता आणि बालकांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधींचे नियंत्रण करणे या बाबींचा समावेश आहे. समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून या सेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
या कार्यशाळेस पंचायत समितीचे सर्व माननीय सदस्य, गटविकास अधिकारी कुलदीप बोगे, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानामुळे कागल तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण होऊन नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा लाभ मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
………………












