बिद्री साखर कारखाना कुस्ती मैदानात चुरशीच्या लढती


बिद्री साखर कारखाना कुस्ती मैदानात चुरशीच्या लढती

– ३०० मल्लांचा सहभाग : मानधनधारक मॅटवरील कुस्ती स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
………..

बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅटवरील मानधनधारक कुस्ती स्पर्धेला आज उत्साहपूर्ण वातावरणात शानदार प्रारंभ झाला. कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील, व्हाइस चेअरमन मनोज फराकटे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.

या स्पर्धेत कारखाना कार्यक्षेत्रातील विविध वजन गटांमधील तब्बल ३०० मल्लांनी सहभाग नोंदवला असून, पहिल्याच दिवशी रंगलेल्या चुरशीच्या आणि थरारक कुस्त्यांनी मैदान अक्षरशः दणाणून गेले. आक्रमक डावपेच, झपाट्याने होणाऱ्या झटापटी आणि प्रेक्षणीय फेऱ्यांमुळे हजारो कुस्ती शौकीनांचे डोळे खिळून राहिले. मैदानात उसळलेल्या जल्लोषामुळे हा सोहळा कुस्ती रसिकांसाठी खरीच पर्वणी ठरला.

स्पर्धा सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये पार पडत आहेत. सकाळच्या सत्रात वजन काटा पूजन कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील-बानगेकर आणि संचालक रणधीर विजयसिंह मोरे यांच्या हस्ते झाले. तर सायंकाळी पारंपरिक आखाडा पूजन अध्यक्ष के. पी. पाटील, व्हाइस चेअरमन मनोज फराकटे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण “कुस्ती हेच जीवन” या माध्यमातून करण्यात येत असून, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी विविध गटांत विजयी ठरलेल्या मल्लांमध्ये उद्या अंतिम लढती रंगणार असून, या थरारक कुस्त्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने कारखान्याचे संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे, तसेच परिसरातील नामांकित मल्ल व वस्ताद यांच्या उपस्थितीत वातावरण अधिक रंगतदार झाले. मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो कुस्तीप्रेमींनी जल्लोषात या स्पर्धांचा आनंद लुटला.
………………

 


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!