गलगले व हमीदवाडा येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार : मंत्री हसन मुश्रीफ


गलगले व हमीदवाडा येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार : मंत्री हसन मुश्रीफ

कागल : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……….
मेतगे येथील बाळूमामा मंदिराकडे दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून त्यामुळे गलगले व हमीदवाडा परिसरात वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गलगले येथील माळवाडीपासून पुलामार्गे खडकेवाडा मुख्य रस्त्यापर्यंत नवीन पर्यायी रस्ता उभारण्याची आवश्यकता असून त्यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

गलगले येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या फिल्टर हाऊससह नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन, नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे उद्घाटन तसेच मरगूबाई मंदिरासमोरील काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मेतगे येथील बाळूमामा मंदिर हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. विशेषतः शनिवार, रविवार तसेच विविध धार्मिक उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहने या मार्गावरून ये-जा करतात. परिणामी गलगले व हमीदवाडा गावांमधून जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गलगले येथील माळवाडीपासून थेट पुलामार्गे खडकेवाडा मुख्य रस्त्याला जोडणारा पर्यायी मार्ग विकसित केल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन भाविक व स्थानिक नागरिक दोघांनाही मोठा दिलासा मिळेल. या रस्त्यासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पुनर्वसन अंतर्गत असलेल्या निवळे वसाहतीतील नागरिकांच्या जमिनींसह विविध प्रलंबित प्रश्नांबाबतही सकारात्मक भूमिका मांडली. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. विकासकामांसोबत सामाजिक सलोखा टिकविणे ही काळाची गरज असून सर्व घटकांना सोबत घेऊनच विकासाचा मार्ग पुढे नेला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, “राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत संघर्ष झाला, मतभेद झाले; मात्र आमची नियत कायम स्वच्छ होती. कागल तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे. तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे यापुढील काळात कोणतीही निवडणूक न लढवता मी विकासाच्या या प्रवासात मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत राहणार आहे.”

माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत कागल तालुका विकासाच्या बाबतीत राज्यात सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, उद्योग आणि मूलभूत सुविधांच्या क्षेत्रात झालेली प्रगती ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. विकासाच्या बाबतीत त्यांनी कागलचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर निर्माण केला आहे.”

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, पंचायत समिती सदस्या सौ. मनिषा पाटील तसेच सरपंच सौ. विद्या शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी उपसरपंच सतीश घोरपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक डी.पी.पाटील, काका पाटील, विलासराव पाटील, मयूर आवळेकर, युवराज जाधव, रामदास किल्लेदार, संदीप पाटील, एकनाथ कुंभार, सतीश घोरपडे, सदाशिवराव तुकान, मारुती मगदूम, विलास पाटील, संजय पाटील, प्रकाश डावरे, दत्तात्रय पाटील, बशीर नदाफ, बाळासाहेब पाटील, गणपती जाधव, महेश पाटील, सुकुमार खोत, पांडुरंग कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले तर संदीप पाटील यांनी आभार मानले.
—————-
मंत्री मुश्रीफांचे नाव सुवर्णाक्षरांनी……

“ज्या दिवशी कागल तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल, त्या दिवशी विकासाच्या बाबतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले जाईल. गेल्या दोन दशकांत त्यांनी कागलच्या मातीत रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा जो तेजस्वी व ओजस्वी विकास घडवून आणला आहे, तो राज्यासाठी आदर्शवत ठरला आहे. असे गौरवोद्गार उपसरपंच सतीश घोरपडे यांनी प्रास्ताविकात काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
……….


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!