१० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना आता मिळणार ‘एकत्रित’ गुणपत्रक व प्रमाणपत्र; नावातही होणार बदल
बिद्री: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. या वर्षापासून इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्र न देता, ते ‘एकत्रित’ स्वरूपात देण्यात येणार आहेत.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, सर्व विभागीय मंडळांना या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ गुणपत्रक एकत्र होणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमातही बदल करण्यात आला आहे. आता गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव (विद्यार्थ्याचे नाव), (वडिलांचे नाव) आणि (आडनाव) या क्रमाने छापले जाणार आहे. या बदलामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या नावाचा क्रम तपासून घेणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्रावरील फोटो अस्पष्ट होते आणि ज्यांचे फोटो मुख्याध्यापकांनी दुरुस्त केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा अपलोड करणे अनिवार्य आहे. गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर असतील. विद्यार्थ्याचे स्वतःचे नाव पहिले, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असेल. नावात किंवा फोटोत काही त्रुटी असल्यास शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडून तातडीने दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












