शक्तीपीठ महामार्गासाठी सक्ती केल्यास जनआंदोल छेडणार; पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांचा इशारा
बिद्री : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)
व्हिजन मराठी न्यूज
……………
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर या तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे. या महामार्गासाठी सुपीक जमिनींचे संपादन सक्तीने करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा बोरवडे विभागाचे पंचायत समिती सदस्य (शिंदे गट) बालाजी फराकटे यांनी दिला आहे. बोरवडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शक्तीपीठ महामार्ग हा बोरवडे, मालवे, उंदरवाडी, तुरंबे, नाधवडे या भागातून जाणार असून बोरवडे परिसरात यापूर्वीच सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या भागातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कायमच्या नष्ट होणार असून हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. “आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको, आम्ही आमच्या जमिनी देणार नाही” अशी आक्रमक भूमिका यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घेतली. कोणत्याही परिस्थितीत सरकारी अधिकाऱ्यांना या भागात फिरू देणार नाही आणि जबरदस्तीने प्रकल्प राबवल्यास फराककटे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला सुनील मगदूम, पांडुरंग खाडे, कृष्णांत केसरकर, बाळासो सूर्यवंशी, रोहित फराक्टे, नेताजी साठे, श्रीकांत बलुगडे, भास्कर कांबळे, लक्ष्मण मगदूम, सातापा साठे, विशाल मगदूम, राजेंद्र साठे, सातापा मगदूम, नामदेव साठे, सुरेश यादव यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. महामार्गामुळे होणारे विस्थापन आणि पिकांचे नुकसान यामुळे संपूर्ण पट्ट्यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.
………












