राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५२ वी जयंती राधानगरी धरणस्थळी विविध उपक्रमांनी साजरी करणार : राजे समरजितसिंह घाटगे


राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५२ वी जयंती राधानगरी धरणस्थळी विविध उपक्रमांनी साजरी करणार : राजे समरजितसिंह घाटगे

सलग सहाव्या वर्षी विविध उपक्रमांतून
शाहूंच्या विचारांचा जागर

राधानगरी : प्रतिनिधी  (सागर सरदेसाई )
व्हिजन मराठी न्यूज
……………

समता, सामाजिक न्याय आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे अध्वर्यू असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त येत्या २६ जून रोजी त्यांनी उभारलेल्या राधानगरी धरणस्थळी विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी हा जयंती सोहळा सलग सहाव्या वर्षी या ठिकाणी साजरा होत असल्याची माहिती ‘शाहू ग्रुप’ चे अध्यक्ष व राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य केवळ प्रतिमापूजनापुरते मर्यादित न राहता त्यांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या उत्तूंग कार्याचा गौरव व्हावा,अशी भूमिका सहकारमहर्षी स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांची होती. त्याच विचारातून राधानगरी धरणस्थळी जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. शाहू महाराज आणि त्यांचे बंधू कागल संस्थानचे तत्कालीन अधिपती पिराजीराव घाटगे ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी जलसिंचनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून राधानगरी धरणाची उभारणी केली. त्यांच्या या दूरदृष्टीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश आहे.राधानगरीच्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. या जन्मोत्सवाची संकल्पना राधानगरी परिसरातील एका धनगर बांधवाने मांडली होती. जन्मोत्सव समितीच्या निमंत्रणानुसार राजे समरजितसिंह घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नवोदिता घाटगे गेल्या पाच वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यंदाचा सोहळा अधिक भव्य आणि प्रेरणादायी स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी दहा वाजता राजे समरजितसिंह घाटगे, सौ. नवोदिता घाटगे तसेच बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या जोडप्यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजन करून जलाभिषेकासाठी कलश आणण्यात येतील. त्यानंतर शाहू महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक, पूजन आणि अभिवादन करण्यात येणार आहे.

यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणारषआहेत. या सोहळ्यास शाहूप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
……………………………………………………………….
    कसबा बावडा ते राधानगरी ‘समता रॕली’ !

यंदाच्या जयंती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणारी ‘समता रॕली’ प्रथमच आयोजित करण्यात आली आहे.छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या कसबा बावडा येथून सुरू होणारी ही रॕली राधानगरी धरणस्थळी येऊन समाप्त होणार आहे. शाहूप्रेमी नागरिकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या रॕलीतून शाहू महाराजांच्या समता, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकतेच्या विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.असेही राजे समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

………………………………………………………………

यावेळी संभाजी आरडे सुमित चौगुले मानसिंग पाटील विलास रणदिवे स्वप्निल जरग संभाजी फराकटे प्रकाश पाटील शाहूचे संचालक सचिन मगदूम नगरसेवक दीपक मगर राजे बँकेचे संचालक रणजीत पाटील धैर्यशील इंगळे उपस्थित होते.
………


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!