लोकांच्या जीवनात आनंद व उर्जा निर्माण होण्यासाठी कणेरी मठावर विद्यापीठ व्हावे : पालकमंत्री आबिटकर
– सिद्धगिरी कारागिरी महाकुंभाला पाच लाख लोकांनी दिली भेट
कोल्हापूर : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)
भारतीय संस्कृतीचे जतन आणि जोपासना करण्याच्या उद्देशाने कणेरी येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठावर आयोजित करण्यात आलेल्या ‘सिद्धगिरी कारागिरी महाकुंभ’ या भव्य उपक्रमाची सांगता शनिवारी उत्साहात झाली. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवाला सुमारे पाच लाख भाविक आणि पर्यटकांनी भेट दिली. या सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, लोकांच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण होण्यासाठी कणेरी मठ येथे विविध गोष्टींचे विद्यापीठ व्हावे, असे आग्रही प्रतिपादन केले.
कारागिरांना बाजारपेठ मिळवून देण्याची गरज
यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, समाजातील अठरापगड जातीतील कारागिरांच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने त्यांना कायमस्वरूपी विद्यापीठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्हा निसर्ग आणि साधनसंपत्तीने समृद्ध असूनही, येथील कारागिरांना रोजगारासाठी मुंबईसारख्या महानगरांकडे स्थलांतर करावे लागते. हे स्थलांतर थांबवण्यासाठी पर्यटन उद्योगातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे.
देशाला संस्कारक्षम दिशा मिळतेय: मान्यवरांचे विचार
खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्टार्टअप इंडिया मोहिमेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “२०१४ पूर्वी देशात फक्त ३५० स्टार्टअप होते, जे आज ४ लाखांवर पोहोचले आहेत. काडसिद्धेश्वर स्वामीजी हे एक शास्त्रज्ञ असून ते वारंवार नवनवीन प्रयोग करत असतात, ज्यामुळे देशाला एक संस्कारक्षम दिशा मिळत आहे.” म्हाडाचे माजी अध्यक्ष समरजित घाटगे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आणि असा उपक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून कागलमध्येही व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
१७ राज्यांतील कारागिरांचा सहभाग
या महाकुंभामध्ये देशातील १७ राज्यांतील सुमारे २०० कारागीर सहभागी झाले होते. कारागिरांच्या हातातील कलेला थेट व्यासपीठ मिळवून देणे हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. प्रदर्शनातील स्टॉल्सना इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की सर्व उत्पादनांची विक्रमी विक्री झाली. तसेच विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनीही आपले नाविन्यपूर्ण प्रकल्प येथे सादर केले होते.
विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केंद्र सरकारच्या ‘विश्वकर्मा योजने’वर प्रकाश टाकला. देशात जवळपास १० कोटी कारागीर असून त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. लोहार, विणकाम करणारे यांसारख्या कारागिरांना या योजनेमुळे पुनरुज्जीवन मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सांगता समारंभाला आमदार राहुल आव्हाडे, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जालिंदर पाटील, यशवंतराव बारांमतेकर, जे. पी. वहू, डॉ. वर्षा पाटील, रवींद्र लाड आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले.












