सावर्डे बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन
बिद्री : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)
व्हिजन मराठी न्यूज
…………….
कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथील धम्मपालन बुद्धविहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २४ एप्रिल आणि शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ असे दोन दिवस हे कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती बौद्ध समाज सावर्डे बुद्रुक यांच्या वतीने देण्यात आली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आणि ध्वजारोहण शुक्रवार, २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदूरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष आरपीआय उत्तम कांबळे, दलित मित्र बळवंतराव माने, कागल पं. स. कागलचे उपसभापती इंद्रजित पाटील, जि. प. सदस्य शोभाकाकी फराकटे, बिद्री साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मनोज फराकटे, राजश्री चिंदगे, उपसरपंच सागर सावर्डेकर, पोलीस पाटील राजेंद्र कुंभार यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम:
शुक्रवार, २४ एप्रिल रोजी ध्वजारोहणानंतर दुपारी १२ वाजता श्री साई ब्लड बँक गारगोटी यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ६ वाजता पन्हाळ्याचे सत्यशोधक विनायक रेडेकर यांचे ‘शिव-शाहू-फुले आंबेडकर समतेचा विचार’ या विषयावर व्याख्यान होईल. रात्री ९ वाजता स्थानिक कलागुणांना वाव देणारा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
शनिवार, २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता प्रतिमापूजन होईल. त्यानंतर सकाळी ११ ते ४ या वेळेत महिलांसाठी खास विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता रमाई लेझीम पथक (सावर्डे बु।।) आणि नागनाथ म्युझिकल बँजो पार्टी (सोनाळी) यांच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. महोत्सवाची सांगता रात्री ९ वाजता ‘शिल्पकार संविधानाचे, मुंबई’ यांच्या ‘बुद्ध व भीम गीतांच्या’ प्रबोधनपर संगीतमय कार्यक्रमाने होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सावर्डे बुद्रुक आणि परिसरातील प्रमुख मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक बौद्ध समाज, सावर्डे बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
………..












