आदमापूर येथे सुसज्ज एसटी बसस्थानक उभारण्याची मागणी


आदमापूर येथे सुसज्ज एसटी बसस्थानक उभारण्याची मागणी
– आदमापूर ग्रामपंचायतीच्या मागणी

​बिद्री: प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज

भुदरगड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मौजे आदमापूर येथे श्री सद्गुरु बाळूमामांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात. मात्र, येथे हक्काचे एसटी बसस्थानक नसल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आदमापूर ग्रामपंचायतीने गावात अद्ययावत एसटी स्टँड उभारण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी राज्याचे परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच/ प्रशासक विजयराव गुरव यांनी दिली.

​​भाविकांची गैरसोय आणि तांत्रिक अडचणी
आदमापूर येथे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण राज्यातून भाविकांचा ओघ असतो. रात्रीच्या वेळी राज्यभरातील सुमारे ६ ते ७ विविध आगारांच्या एसटी बसेस येथे मुक्कासाठी  येतात. मात्र, बसस्थानकाची अधिकृत जागा नसल्यामुळे या बसेस लावताना चालकांना कसरत करावी लागते आणि भाविकांनाही ताटकळत उभे राहावे लागते. या सर्व बाबींचा विचार करता, येथे सुसज्ज बसस्थानक होणे ही काळाची गरज बनली आहे.

ठरावास सर्वानुमते मंजुरी

या मागणीचा प्रस्ताव अमर रंगराव पाटील यांनी मांडला, तर त्याला सौ. सुमन विजय गुरव यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षरीने हा ठराव आता पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठवला जाणार आहे.

परिवहन मंत्र्यांनी या मागणीची त्वरित दखल घेऊन बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
……….


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!