बाचणी येथील श्री दूधगंगा पतसंस्थेतर्फे गुढीपाडव्यानिमित्त विविध गुंतवणूक योजनांचा शुभारंभ
बाचणी : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाचणी (ता. कागल) येथील ‘श्री दूधगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थे’च्या वतीने ठेवीदारांसाठी विविध आकर्षक गुंतवणूक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांना अल्पबचतीतून लक्षाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, या उद्देशाने या योजनांचे नियोजन करण्यात आले आहे.
संस्थेचे चेअरमन निवास महादेव पाटील (माजी सरपंच) यांनी या योजनांची माहिती दिली. गुढीपाडव्यानिमित्त ‘श्री दूधगंगा लखपती ठेव योजना’ सुरू करण्यात आली असून, यात २८ महिन्यांसाठी १ लाख रुपये गुंतवणूक केल्यास १.२५ लाख रुपये परतावा मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी किमान १० हजारांच्या पटीत रक्कम स्वीकारली जाईल. याशिवाय दरमहा ३३०, ६६० किंवा १३२० रुपये भरून ५ वर्षांनंतर अनुक्रमे २५ हजार, ५० हजार आणि १ लाख रुपये मिळवण्याच्या मासिक बचत योजनाही उपलब्ध आहेत.
संस्थेने मुदत ठेवींवर (फिक्स्ड डिपॉझिट) ४६ दिवसांपासून ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ७% ते १०% पर्यंत व्याजदर जाहीर केला आहे. २ वर्षे १ महिना ते ५ वर्षांच्या ठेवींवर सर्वाधिक १०% व्याज मिळेल. दामदुप्पट ठेव योजनेचा कालावधी ८४ महिने निश्चित करण्यात आला आहे. रिकरिंग ठेवींसाठी २ वर्षांकरिता ८% आणि ५ वर्षांकरिता ९% व्याजदर देण्यात येईल. तसेच सेव्हिंग ठेवीवर ४% आणि पिग्मी ठेवीवर ६% व्याज दिले जाणार आहे.
गुंतवणूक योजनांसोबतच संस्थेने कर्ज सुविधांबाबतही माहिती दिली. सध्या १३% वार्षिक दराने ‘सोने तारण कर्ज’ उपलब्ध असून १ तोळा सोन्यावर ९०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. संस्थेचे कामकाज पूर्णपणे संगणकीकृत असून, ग्राहकांसाठी जलद सेवा आणि एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. ‘बचतीचे उघडा खाते, आपुलकीचे जोडा नाते’ असे आवाहन करत चेअरमन निवास पाटील, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
……….













