बिद्रीत दीड लाखाचा बेकायदेशीर गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
बिद्री : प्रतिनिधी
बिद्री (ता. कागल) येथील एका दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून सुमारे १ लाख ५३ हजार ५५२ रुपयांचा बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधी सुपारीचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी उदय भिकाजी ढेकळे (वय ३९, रा. मजरे कासारवाडा, ता. राधानगरी) याच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली होती. बिद्री कोल्हापूर रोडवरील मटण मार्केट समोर असलेल्या ‘विघ्नहर्ता ट्रेडर्स’ नावाच्या दुकानात गुटख्याचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दुकानावर छापा टाकला असता, तिथे विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी असा एकूण १ लाख ५३ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला असून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक जालिंदर जाधव. अरविंद पाटील, रोहित मदने, विजय इंगळे, युवराज पाटील, अमित सर्जे, सुशील पाटील, सचिन पारखे आणि जयवंत ढोकरे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.
…….












