आ. सतेज पाटील यांनी केली ‘गोकुळ’ च्या निवडणूकीत ‘ राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ ची स्थापना
– गोकुळ वाचवण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र या: आमदार सतेज पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
………………
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया आता गतिमान झाली असून, राजकीय आणि सहकारी वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’च्या वतीने आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी जिल्ह्यातील दूध संस्थांचे अध्यक्ष, संचालक आणि ठरावधारकांना एक भावनिक आणि जाहीर आवाहन केले आहे. पक्षीय राजकारणात न अडकता, साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गोकुळची अस्मिता टिकवण्यासाठी योग्य व्यक्तीच्या नावावर ठराव करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
गोकुळचे ग्रामीण अर्थकारणातील योगदान अद्वितीय
आमदार सतेज पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा प्रामुख्याने ऊस, दूध आणि उद्योगांमुळे झाला असून, यामुळेच महाराष्ट्र राज्यात दरडोई उत्पन्नात कोल्हापूर सहाव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ‘गोकुळचे शिल्पकार’ कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी प्रगतिपथावर नेलेला गोकुळ संघ आज जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था आहे. दर दहा दिवसाला साडेपाच लाख शेतकऱ्यांना तब्बल ८० कोटी रुपयांचे दुधाचे बिल देणारी ही एकमेव संस्था असून, ग्रामीण भागातील माता-भगिनी आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण गोकुळवरच अवलंबून आहे.
’गोकुळ’ टिकवण्यासाठी योग्य व्यक्तीच्या नावावर ठराव करा
गेल्या पाच वर्षांत गोकुळच्या माध्यमातून साडेपाच लाख शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका आम्ही घेतली आहे, असे नमूद करत आमदार पाटील म्हणाले की, “अशा वेळी गोकुळ दूध संघाची सत्ता एका विचाराने काम करणाऱ्या चांगल्या लोकांच्या हाती असणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी दूध संस्थेच्या माध्यमातून योग्य व्यक्तीच्या नावावर ठराव करणे आणि भविष्यात गोकुळ टिकवणे या दृष्टीने ठरावधारकांनी योग्य व सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.”
पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याचे आवाहन
गेल्या तीन महिन्यांपासून गोकुळच्या संदर्भाने सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, पक्षीय राजकारणात न अडकता गेल्या पाच वर्षांत गोकुळ चांगल्या पद्धतीने चालवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीकडे पक्षीय भूमिकेतून न पाहता, लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची ही व्यवस्था टिकली पाहिजे, या व्यापक दृष्टिकोनातून सर्वांनी याकडे पाहावे. यासाठी संस्थेचा ठराव व्यापक भूमिका असणाऱ्या सभासदाच्या नावे करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
स्वाभिमानी सभासदांच्या बळावर पुन्हा लढणार
”आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेऊन मी अनेक लढायांना आपल्यासारख्या स्वाभिमानी सभासदांच्या पाठबळावर सामोरा गेलो आहे. या वेळीसुद्धा आपण सर्वजण मला खंबीर साथ द्याल, असा पूर्ण विश्वास आहे,” अशी भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार सतेज पाटील यांनी थेट ठरावधारकांशी संवाद साधत ही व्यापक भूमिका मांडल्याने, आता जिल्ह्यातील राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
…………….












