‘गोकुळ’च्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे पॅनेल बनवावे;
– गोकुळचे संचालक युवराज पाटील व भैय्या माने यांची मागणी
कागल : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……………………..
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी एका पत्रकाद्वारे महत्त्वाची मागणी केली आहे. नामदार हसनसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षांचे संयुक्त पॅनेल बनवावे, असे या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील व माने यांनी नमूद केले की, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील महायुतीतील नेत्यांच्या तडजोडीबाबत काही नेत्यांशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काही नेते, नामदार हसनसाहेबां मुश्रीफ, पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनयरावजी कोरे यांच्याशी चर्चा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मात्र, काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि विशेषतः नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना डावलून पॅनेल तयार करण्याची भूमिका मांडल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांच्या वतीने नामदार मुश्रीफ यांना कळकळीची विनंती करण्यात आली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सोबत येणाऱ्या मित्र पक्षांना घेऊन ही निवडणूक लढवावी.
”आम्ही छातीठोकपणे सांगतो की, गोकुळ दूध संघात महायुतीचीच सत्ता येईल. या निकालाच्या रूपाने मुख्यमंत्र्यांना एक चांगली भेट देऊ,” असा विश्वासही पाटील व माने यांनी व्यक्त केला आहे. तसेच या संदर्भात भविष्यात जेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, तेव्हा नामदार मुश्रीफ यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडावा, अशी आग्रही मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावावा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवावे. त्या माध्यमातून दूध उत्पादक हे सत्तेमध्ये असलेल्या महायुतीच्याच बाजूने आहेत, हे एकदा सिद्ध करावे.
………….












