के. डी. सी. सी. बँकेची पीक कर्ज वसुली ८६.२२ टक्के


के. डी.सी. सी. बँकेची पीक कर्ज वसुली ८६.२२ टक्के

जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यात ८० टक्के वाटा के.डी.सी.सी. बँकेचा

कोल्हापूर : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज

……,…………………

के. डी. सी. सी. बँकेने शेती पीक कर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. ३० जून २०२६ अखेर पीककर्ज वसुली ८६.२२ टक्क्यांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यामध्ये ८० टक्के वाटा एकट्या के. डी. सी. सी. बँकेचा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील एकूण १९३७ विकास संस्थांच्या माध्यमातून २ लाख ६० हजार शेतकऱ्यांना सन २०२५-२६ या पीक हंगामाकरीता कर्ज वितरण केले होते. ३० जून २०२६ अखेर ₹ २५९५ कोटी वसूलपात्र शेती व पीक कर्ज रक्कमेपोटी एकूण ₹ २२३७ कोटी शेती व पीक कर्ज वसूल झालेले आहे.

याबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे म्हणाले, गेल्यावर्षी पीक कर्ज वसुली ९० टक्के झाली होती. महाराष्ट्र राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत थकबाकीदार सभासदांना समाविष्ट केल्यामुळे रु 200 कोटी थकबाकी बँकेने शासनाच्या पोर्टलवर भरलेली आहे. शासनाकडून बँकेला ही रक्कम जर वेळेत आली असती तर वसुलीचे प्रमाण ९४ टक्के झाले असते.

शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या व सहकार खाते यांनी बँकेला कर्ज वसुलीसाठी मोलाचे सहकार्य केलेले आहे. तसेच, बँकेच्या सर्व संचालक मंडळानेही माहे मे व जूनमध्ये आपापल्या तालुक्यातील विकास सेवा संस्थांच्या वसुलीसाठी आढावा सभा घेऊन वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या पिक हंगामातसुद्धा बँकेने चांगल्या वसुलीची परंपरा कायम राखली.

कर्जमाफीच्या धोरणामुळेवसुली ८६ टक्क्यांवर थांबली !

याबद्दल बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, वास्तविक यावर्षीची वसुली ९७ ते ९८ टक्के होईल, असा आमचा विश्वास होता. परंतु; सरसकट कर्जमाफी होईल या विचाराने पीक कर्ज भरले गेले नाही. त्यामुळे आमची पीक कर्ज वसुली ८६ टक्क्यांवरच थांबली.
===========


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!