कागल तालुक्यातून देवानंद पाटील यांना जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदी निवड करावी. कार्यकर्त्यांमधून मागणी
बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
………………
कागल तालुक्यातील निढोरी येथील लोकनियुक्त माजी सरपंच देवानंद पाटील यांच्याकडे सक्षम नेतृत्व आणि कर्तृत्व असूनही त्यांना प्रत्येक वेळी “थोडं थांबावं लागेल” असे सांगत राजकीय संधींपासून दूर ठेवण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. आता जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी देवानंद पाटील यांना संधी देऊन न्याय द्यावा, अशी तीव्र मागणी तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
प्रस्थापित घराण्यांच्या वर्चस्वात स्वतःची वेगळी ओळख
निढोरी गावात प्रस्थापित सुरेशराव सूर्यवंशी आणि केशवकाका पाटील या दोन घराण्यांचे राजकारणात नेहमीच मोठे वर्चस्व राहिले आहे. गावाचे तसेच बिद्री साखर कारखान्याचे राजकारणीही याच दोन घराण्यांभोवती फिरत आले. अशा आव्हानात्मक परिस्थितीत, कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसतानाही, देवानंद पाटील यांनी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
सामाजिक ऐक्य आणि विकासकामांचा धडाका
निढोरी हे संवेदनशील गाव म्हणून ओळखले जात असताना, गावातील विविध समाजघटकांना एकत्र ठेवण्याचे काम देवानंद पाटील यांनी आपल्या कार्यशैलीतून केले. विशेषतः ‘बारा बलुतेदार’ समाजात समन्वय साधत त्यांनी गावात सामाजिक ऐक्य निर्माण करण्यात यश मिळवले. दरम्यान, ग्रामपंचायतीत त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी सरपंचपद भूषविले, तर देवानंद पाटील यांनी स्वतः गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळविला. आपल्या कार्यकाळात त्यांनी गावाला ‘ब वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा मिळवून देत विविध विकासकामांना मोठी चालना दिली.
उपेक्षित बहुजन नेतृत्वाला संधी मिळण्याची अपेक्षा
ग्रामपंचायतीनंतर देवानंद पाटील यांना गावाबाहेरील राजकारण आणि समाजकारणात काम करण्याची इच्छा होती. मात्र, प्रत्येक वेळी प्रस्थापित घराणी त्यांच्या उमेदवारीच्या आड येत असल्याने त्यांना मोठ्या राजकारणात संधी मिळाली नाही. त्यामुळे उत्तम संघटन कौशल्य असलेल्या, बहुजन समाजातील या उपेक्षित नेतृत्वाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी लोकभावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांनाही बळ देणारे नेतृत्व म्हणून देवानंद पाटील यांच्याकडे पाहिले जात असून, ते प्रस्थापितांसोबतच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही न्याय मिळवून देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
”राजकीय प्रवासाचा शेवट असेल…” देवानंद पाटील यांचे भावनिक उद्गार
या संपूर्ण विषयाबाबत देवानंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत भावनिक मत व्यक्त केले. ते म्हणाले, “राजकारणाबाबत आता मला नैराश्य आले आहे. आतापर्यंत माघार घेण्यातच माझा विक्रम झाला असावा, असे वाटते. यापुढे नेत्यांकडे मी कोणतेही पद मागणार नाही. कदाचित हाच माझ्या राजकीय प्रवासाचा शेवट असेल.”
……..












