पुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर


पुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर
गोकुळ दूध संघाच्या बदनामीबद्दल प्रकाश बेलवाडेंवर कारवाई करा

पुणे : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……………

गोकुळ दूध संघाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल शंभरहून अधिक प्रतिनिधींनी पुण्यात सहकार उपनिबंधक राजकुमार पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. गोकुळ दूध संघाची सातत्याने नाहक बदनामी करणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव होऊनही फिर्याद दाखल झालेली नाही, याबद्दल प्रतिनिधींनी जाब विचारला. तसेच; उपनिबंधक श्री. पाटील यांना आवाहन करण्यात आले की, गोकुळ दूध संघाच्या लौकिकाला बाधा पोहोचवणाऱ्या बदनामीमध्ये नव्हे तर जडणघडणीमध्ये योगदान द्या. या चर्चेत संस्थाप्रतिनिधींनी प्रशासक मंडळातील सदस्य प्रदीप मालगावे यांच्याबाबत जोरदार तक्रारी केल्या.

आज गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या शंभरहून अधिक संस्था प्रतिनिधींनी पुण्यात सहकार उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली. दूध संघाची सातत्याने नाहक बदनामी करणाऱ्या प्रकाश बेलवाडे याला तुम्ही अधिकारी एवढे घाबरता कशासाठी? तो काय महापुरुष लागून गेला काय? असा सवालही प्रतिनिधींनी विचारला. शशिकांत खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, विकास पाटील, शिवाजीराव देसाई आदींनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

यावेळी संस्थाप्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, संस्थाप्रतिनिधींनी मागितलेली विविध प्रकारची माहिती देण्यास प्रशासक मंडळाकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे ही माहिती न मिळाल्यास पुढील काळात आपल्या कार्यालयावर जनावरांचा मोर्चा घेऊन येऊ व आत्मदहन आंदोलन करू. या निवेदनातील मागण्या अशा,

१) सन 2000 ते 2025 या काळातील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत द्या.

2) सन 2000 पासून 2025 पर्यंत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त द्या.

3) सन 2000 पासून आज अखेर वेंकटेश्वरा गुड्स मुव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड- कोल्हापूर यांच्या ठेक्यासंदर्भात झालेल्या ठरावांच्या प्रति व वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत द्या.

4) सन 2000 पासून आज अखेर गायत्री कोल्ड स्टोरेज -पुणे यांच्या दूध पॅकिंग ठेक्याबाबत झालेले निर्णयांचे ठराव व त्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयांचे इतिवृत्तांत द्या.

5) सन 2000 पासून गायत्री कोल्ड स्टोरेज- पुणे यांना दूध पॅकिंगसाठी दिलेल्या पॅकिंग चार्जेसची माहिती व दरवाढीबाबतची माहिती व ठराव प्रती द्या.

6 ) गायत्री कोल्ड स्टोरेज- पुणे यांच्या हलगर्जीपणामुळे दूध पॅकिंगमध्ये झालेल्या संघाच्या नुकसानीची माहिती व त्यांच्यावरील कारवाईकरिता संचालक मंडळाने घेतलेले निर्णय व कारवाई केल्याबाबतची कागदपत्रे द्या.

7) सन 2000 पासून आजअखेरचे सर्व ताळेबंद पत्रके व नफातोटा पत्रके द्या.

8) प्रकाश तुकाराम बेलवाडे यांनी संघाच्या हलाल प्रमाणपत्रावरून समाज माध्यमांवरून गैरसमज निर्माण करून बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर प्राधिकृत संचालक मंडळामार्फत नुकसानीपोटी व बदनामीपोटी केलेल्या कार्यवाहीबाबतच्या व इतिवृत्तांतांच्या प्रति द्या.

9) संघाचे दूध संकलन व दूध विक्रीमध्ये हलाल प्रमाणपत्राच्या गैरसमजुतीमुळे कोणताही परिणाम होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली याबाबतची कागदपत्रे व अशी काळजी घेण्याबाबतचे आदेश प्रशासक मंडळास द्या.

     तो काय महापुरुष लागून गेला काय ?
संस्थाप्रतिनिधींनी उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्याकडे आग्रह धरला की, गोकुळची बदनामी करण्यामध्ये तुमचा हातभार लावू नका. गोकुळ दूध संघाचा लौकिक जपण्यामध्ये योगदान द्या. यावर श्री. पाटील म्हणाले की, या सर्व विषयांची माहिती घेऊन प्रशासक मंडळाची बैठक घेऊ आणि या बैठकीचा अहवाल मुंबईमध्ये वरिष्ठांना पाठवू. प्रकाश बेलवाडे यांनी संघाच्या केलेल्या नाहक बदनामीमुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा ठराव प्रशासक मंडळांने केलेला आहे. याबद्दलची कार्यवाही तातडीने पूर्ण करा. प्रकाश बेलवाडेला तुम्ही अधिकारी एवढे घाबरता कशासाठी ? तो कुणी महापुरुष लागून गेला काय? असे सवालही संस्था प्रतिनिधींनी विचारले.
………..

0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!